अमळनेरमध्ये आठ दिवसांआड पाणीपुरवठा; महिलांचा हंडा मोर्चाचा इशारा! जय मातादी नगर, पारधी वाडा आणि ताडेपुरा परिसरातील नागरिक पाणीटंचाईने हैराण; दोन ते तीन दिवसांत प्रश्न न सुटल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन.

0

अमळनेर/आबीद शेख 


अमळनेर: शहरातील जय मातादी नगर, पारधी वाडा आणि ताडेपुरा परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आठ-आठ दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठा आणि त्यातही केवळ एक तास कमी दाबाने पाणी मिळत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने महिलांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.


परिसरातील नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने अनेकांना रात्रीच्या वेळी इतर ठिकाणांहून पाणी आणावे लागत आहे, तर काही रहिवाशांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, घरातील कामकाजावरही त्याचा परिणाम होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे!
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित व्हॉल्वमन यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणीपुरवठ्यातील अनियमितता आणि कमी दाबामुळे रहिवाशांना आवश्यक तेवढे पाणी साठवता येत नसल्याने महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
पाणी मिळत नसल्याबाबत व्हॉल्वमन विकी महाजन यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी अरेरावीची भाषा वापरत ‘तुम्हाला जे करायचे ते करा’ असे उत्तर दिल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. तसेच, स्थानिक नगरसेवकांकडूनही या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दोन ते तीन दिवसांची मुदत; अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हंडा मोर्चा
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी नगरपरिषद प्रशासनाला दोन ते तीन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत पाणीपुरवठा नियमित करून पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध करून न दिल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महिलांनी दिला आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
पाणीपुरवठा ही नागरिकांची मूलभूत गरज असताना तीनही परिसरांतील रहिवाशांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करावी, कमी दाबामागील कारणे शोधावीत आणि नियमित पाणीपुरवठ्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता महिलांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर नगरपरिषद प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते आणि प्रत्यक्षात पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागतो का, याकडे जय मातादी नगर, पारधी वाडा आणि ताडेपुरा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed