सीजेपीचे आंदोलन; दिल्लीसह मुंबई-पुण्यात कार्यकर्ते रस्त्यावर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड; जंतरमंतरवर पुन्हा आंदोलन छेडण्याचा निर्धार.

0

24 प्राईम न्यूज 11 Oct 2026


नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्वानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने पुकारलेल्या आंदोलनाला शनिवारी दिल्लीसह मुंबई आणि पुण्यात प्रतिसाद मिळाला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापले. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.


दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये विविध ठिकाणी झटापटी झाल्या. आंदोलकांना जंतरमंतरपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अनेक भागांत तरुणांना ताब्यात घेण्यात आले. काही ठिकाणी इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याचे तसेच रस्ते आणि मेट्रो स्थानके बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या कारवाईवर टीका करत अजित दीपक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तरुण आणि नागरिकांच्या असंतोषाला सरकार घाबरले असून, लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षाही गंभीर असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार सीजेपीने व्यक्त केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्वानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यानुसार रविवारी पुन्हा जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
पोलिस बंदोबस्त वाढवला
आंदोलक दिल्लीच्या दिशेने कूच करत असल्याने राजधानीतील अनेक भागांत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. आंदोलकांची धरपकड आणि आंदोलन रोखण्याच्या प्रयत्नांमुळे देशातील राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईबाबत संबंधित यंत्रणांची अधिकृत भूमिका स्पष्ट होणे बाकी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed