शिरूडमध्ये पिण्याच्या पाण्याची उधळपट्टी! व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी गटारीत ग्रामपंचायत कार्यालयाजवळच पाण्याची गळती; ग्रामस्थांमध्ये संताप, ग्रामसेवकांकडून तातडीने दुरुस्तीचे आश्वासन.

0

अमळनेर /आबिद शेख

अमळनेर  : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असताना पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरत आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असून विहिरींची पाणीपातळीही झपाट्याने घटत आहे. मात्र, अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळत असून पाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी थेट गटारीत वाहून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिरूड ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मारोती मंदिरालगत असलेल्या पाणीपुरवठा व्हॉल्व्हमधून सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू होती. गावाला पाणीपुरवठा होत असताना हे पाणी रस्त्यावरून वाहत थेट गटारीत जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे गावाबाहेरील पाण्याच्या टाकीजवळील व्हॉल्व्हमधूनही अशाच प्रकारे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एकीकडे पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे सार्वजनिक पाणीपुरवठ्यातील हजारो लिटर पाणी अशा प्रकारे वाया जात असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी जवळच हा प्रकार सुरू असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष कसे गेले नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

दोन्ही ठिकाणच्या व्हॉल्व्हची वेळेत दुरुस्ती केली असती तर पाण्याची नासाडी टाळता आली असती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने गळती रोखून गावातील इतर व्हॉल्व्हचीही तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

ग्रामसेवकांचे तातडीने दुरुस्तीचे आश्वासन

यासंदर्भात ग्रामसेवक आर. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, “मला याबाबत कल्पना नाही. आजच त्या ठिकाणी हा प्रकार घडला असावा. याबाबत ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संबंधित व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करण्यास सांगतो.”

आता ग्रामपंचायत प्रशासन प्रत्यक्षात किती तत्परतेने कार्यवाही करते आणि पाण्याची नासाडी थांबवते का, याकडे शिरूड ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed