रोटरी क्लब अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; कीर्तीकुमार कोठारी यांची असिस्टंट गव्हर्नरपदी निवड! २०२७-२८ या रोटरी वर्षासाठी महत्त्वाची जबाबदारी; सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या रोटरी क्लब अमळनेरचे सक्रिय सदस्य रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची रोटरी इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट ३०३० अंतर्गत सन २०२७-२०२८ या वर्षासाठी असिस्टंट गव्हर्नरपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे रोटरी क्लब अमळनेरच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.
रोटरी क्लब अमळनेरच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये कीर्तीकुमार कोठारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सध्या ते रोटरी वर्ष २०२६-२०२७ साठी अमळनेर एन्क्लेव्हचे सेक्रेटरी म्हणून पदभार सांभाळत आहेत.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे २०२७-२०२८ साठी नियुक्त डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. किशोर राठी (नागपूर) यांनी ई-मेलद्वारे त्यांच्या निवडीची अधिकृत माहिती दिली आहे.
कीर्तीकुमार कोठारी हे अमळनेर येथील प्रसिद्ध कीर्ती कॉम्प्युटरचे संचालक असून अकाउंटिंग क्षेत्रातही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि कुशलतेने पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या निवडीबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील ज्येष्ठ पदाधिकारी, रोटरी परिवारातील सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही माहिती रोटे. मकसूद बोहरी यांनी दिली.

