अमळनेरात गोवंशाची अवैध वाहतूक उघड; ७ वाहनांसह ३० गोवंश जप्त रेल्वे उड्डाणपुलाखाली गोरक्षकांची कारवाई; सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : शहरात गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आला. रेल्वे उड्डाणपुलाखाली गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयास्पद सात वाहने अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये तब्बल ३० गोवंशीय जनावरे दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. यानंतर सर्व वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.

गोरक्षक अभय महाजन, जयेश चौधरी, विजय पाटील आणि सचिन महाजन यांना संशय आल्याने त्यांनी ही वाहने अडवली. वाहनांमध्ये जनावरे क्षमतेपेक्षा अधिक संख्येने कोंबून भरल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना याबाबत माहिती दिली.
पोलीस निरीक्षक निकम यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी सिद्धांत शिसोदे, हेडकॉन्स्टेबल विनय पाटील आणि संजय बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहनचालकांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे जनावरांच्या खरेदी-विक्रीचे कागदपत्रे तसेच वाहतुकीचे आवश्यक परवाने आढळून आले नाहीत. जनावरे कुठून आणली आणि कुठे नेली जात होती, याबाबतही चालकांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
त्यानंतर पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची तपासणी करून घेतली. जनावरांना पुढील देखभाल व संगोपनासाठी गोशाळेत पाठविण्यात आले असून, सातही वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
या कारवाईत सात वाहने आणि ३० गोवंशीय जनावरे असा सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये सात वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनचालकांची नावे संजय पाटील (पठासखेडे, ता. भडगाव), शरद बाळू पाटील (महिंदळे, ता. भडगाव), प्रदीप सुभाष धनगर (धरणगाव), चंदू कैलास पाटील (बोरगाव, ता. धरणगाव), समाधान विठ्ठल माळी (धरणगाव), सचिन विश्वासराव चव्हाण (भाटिया गल्ली, धरणगाव) आणि रोहित प्रमोद पाटील (भवरखेडा) अशी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.

