अमळनेर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; खेळाडूंच्या जोशपूर्ण सहभागाने मैदान दणाणले.
अमळनेर/ आबीद शेख 
अमळनेर : क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव तसेच अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर उत्साहपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात पार पडल्या.
या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील, खा. शि. मं.चे कार्याध्यक्ष व सी.ए. नीरजजी अग्रवाल, खा. शि. मं.च्या समन्वय समितीचे चेअरमन योगेश मुंदडे, प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. के. अग्रवाल, डी.आर. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, नरेंद्र घोडपडे, तालुका क्रीडा अध्यक्ष व पर्यवेक्षक एस. पी. वाघ, क्रीडा समितीचे महेश माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर स्पर्धेची मशाल प्रज्वलित करण्यात आली. विविध रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी खेळाडूंनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त जल्लोष केला. उद्घाटनानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी आमदार अनिलदादा पाटील यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, एकात्मता आणि आत्मविश्वास वाढतो. शारीरिक चपळता निर्माण होऊन शरीर निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी नियमित मेहनत घेण्याबरोबरच स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी के. आर. बाविस्कर, कमलेश मोरे, गोकुळ बोरसे, जे. व्ही. बाविस्कर, बापुराव सांगोरे, प्रीतेश तुरणकर, नितीन पाटील, सुनील करंदीकर, मनोज पाटील, हिरालाल बाविस्कर, विनायक सूर्यवंशी, दर्शन पाटील, मयूर बारस्कर, सागर चावरिया, योगेश पाटील आणि राज जाधव यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली.

