विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी २४ तास सेवेत तत्पर; चारुशीला महाजन यांचा ‘आदर्श अधिकारी-कर्मचारी’ पुरस्काराने गौरव.
अमळनेर/ आबीद शेख 
आदिवासी विकास विभागाच्या यावल प्रकल्प कार्यालयांतर्गत अमळनेर तालुक्यातील दहिवद शासकीय आश्रमशाळेत अधीक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या चारुशीला महाजन यांच्या उत्कृष्ट, सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक सेवेला शासनाने गौरविले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श अधिकारी-कर्मचारी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

पिंगळवाडे आश्रमशाळेपासून सुरू झालेल्या त्यांच्या सेवाप्रवासात विद्यार्थिनींची सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकास या बाबींना त्यांनी सातत्याने प्राधान्य दिले. मुलींच्या वसतिगृहाची जबाबदारी अत्यंत संवेदनशील असतानाही त्यांनी २४ तास सेवाभावाने कार्य करत वसतिगृहाला स्वतःचे घर मानून विद्यार्थिनींची काळजी घेतली.

कर्तव्य बजावताना आलेल्या वैयक्तिक अडचणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर मात करून त्यांनी सेवेत सातत्य राखले. त्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि अथक परिश्रमांची शासनाने घेतलेली दखल हा त्यांच्या दीर्घ सेवाप्रवासाचा सन्मान असल्याची भावना परिवाराकडून व्यक्त करण्यात आली.
या उल्लेखनीय यशामागे आई-वडिलांचे संस्कार, जीवनसाथी दीपक महाजन यांचे मोलाचे पाठबळ तसेच संपूर्ण परिवाराचा आधार लाभल्याचे त्यांनी नमूद केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक होत असून, पुढील सेवावाटचालीसाठी त्यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
