अमळनेर बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम नगरपरिषद व लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने श्रमदान; स्वच्छतेचा संदेश.

0

अमळनेर/आबीद शेख
अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियान व स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून अमळनेर नगरपरिषद व लायन्स क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम व श्रमदान उपक्रम घेण्यात आला.


यावेळी सहभागी झालेल्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातमोजे, मास्क व झाडूच्या सहाय्याने बस स्थानक परिसर, प्रवासी थांबे तसेच बसेस उभ्या राहण्याच्या जागेची स्वच्छता केली. परिसरातील कचरा, प्लास्टिक व पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ तसेच नशामुक्त भारताची शपथ देण्यात आली. ‘चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान’ हा संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. बस स्थानक हे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेले महत्त्वाचे ठिकाण असल्याने परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रशासनासोबतच नागरिकांचीही जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रवासी, व्यावसायिक व नागरिकांनी कचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता कचराकुंडीचा वापर करावा, तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी लायन्स क्लबचे पदाधिकारी, अमळनेर नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, प्रभाग मुकादम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ राबविण्यात येत असून, ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या संकल्पनेतून नागरिकांनीही स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed