पिंपळे नाला अतिक्रमणप्रकरणी भूषण भदाणेंचे उपोषण अखेर मागे आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासन; ६ ऑक्टोबरला प्रशासकीय बैठक.

0

अमळनेर/आबीद शेख

अमळनेर : प्रभाग क्रमांक १६ मधील पिंपळे नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहावर कथित अतिक्रमण व अरुंदीकरणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण संजय भदाणे यांनी शुक्रवारी (२ ऑक्टोबर) अमळनेर प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, सायंकाळी आमदार अनिल भाईदास पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे आणि अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर भदाणे यांनी उपोषण मागे घेतले.


पिंपळे नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहाची संयुक्त मोजणी करून त्याची मूळ हद्द व नैसर्गिक रुंदी निश्चित करावी, कथित अतिक्रमणाचा पंचनामा करावा तसेच अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी भदाणे यांनी केली होती. या मागण्यांसाठी त्यांनी प्रशासनाला उपोषणाची पूर्वसूचना दिली होती.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी, अमळनेर भाग यांच्या कार्यालयाकडून २ ऑक्टोबर रोजी भदाणे यांना लेखी पत्र देण्यात आले. या पत्रात पिंपळे नाल्याच्या कथित अतिक्रमण व अरुंदीकरणाबाबत यापूर्वी नगरपरिषदेकडे निवेदने प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणात नगरपरिषदेकडून कार्यवाही सुरू असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, पुढील कार्यवाहीसाठी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्या दालनात संबंधित विभागांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे पत्रात नमूद आहे. या बैठकीत निवेदनातील मागण्यांबाबत प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी भदाणे यांनी अमळनेर प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. दिवसभर प्रशासनाकडून चर्चेचे प्रयत्न सुरू होते. सायंकाळी आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. त्यानंतर लेखी आश्वासन मिळाल्याने भदाणे यांनी उपोषण मागे घेतले.
६ ऑक्टोबरच्या बैठकीकडे लक्ष
पिंपळे नाल्याची प्रत्यक्ष संयुक्त मोजणी, नैसर्गिक प्रवाह व हद्द निश्चिती तसेच कथित अतिक्रमणाबाबत पुढील प्रशासकीय कार्यवाही यावर आता ६ ऑक्टोबरच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित राहावा आणि या प्रकरणात नियमानुसार कार्यवाही व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार,” अशी भूमिका भूषण भदाणे यांनी घेतली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, नगरसेवक सचिन पाटील, पत्रकार जितू ठाकूर, ॲड. यज्ञेश्वर पाटील, भाजपा लचे माजी शहरध्यक्ष उमेश वाल्हे, शीतल देशमुख, मार्केट संचालक समाधान धनगर, दीपक पाटील, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष दुर्गेश पाटील, सुनील शिंपी, सनी गायकवाड, प्रवीण देशमुख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष आरिफ भाया, गोविंदा बाविस्कर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed