उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात; पुलावरून खाली पडलेल्या विजय भार्गव यांचा दुर्दैवी मृत्यू.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : प्रताप महाविद्यालयाच्या उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात होऊन पुलावरून खाली पडलेल्या व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत शहरातील भृगु ज्योतिषी फर्मचे ज्योतिष विशारद विजय घनश्याम भार्गव उर्फ विजू महाराज (वय ४५, रा. केशव नगर, अमळनेर) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय भार्गव हे त्यांच्या मुलीसोबत मोटरसायकल क्रमांक एमएच १९ बीई १०२९ वरून शहराकडून केशव नगरकडे जात होते. तत्वज्ञान केंद्राजवळ त्यांच्या दुचाकीला कोणत्यातरी वाहनाचा कट लागल्याने दुचाकीवरील दोघेही खाली पडले. यावेळी विजय भार्गव हे उड्डाणपुलावरून खाली तत्वज्ञान केंद्राजवळ पडल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातात त्यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत ते काही वेळ घटनास्थळी विव्हळत पडले होते. दरम्यान, प्रताप महाविद्यालयाचे कर्मचारी प्रविण डबेलकार तसेच भार्गव यांच्या पत्नी घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तातडीने विजय भार्गव यांना एपे रिक्षातून डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
यानंतर त्यांचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेमुळे केशव नगर परिसरात तसेच त्यांच्या परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कसा घडला, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

