अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी आमदार अनिल पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी अखेर अमळनेर मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा मार्ग मोकळा.

0

अमळनेर /आबिद शेख
अमळनेर : पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने संकटात सापडलेल्या अमळनेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी आमदार अनिल पाटील यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा अखेर यशस्वी झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार अमळनेर मतदारसंघाचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत व विविध सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२०२६ च्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने अमळनेर व पारोळा तालुक्यांतील अनेक भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली होती. पिके करपू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच महायुती सरकारचे आभार मानले.

दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी नुकताच शासकीय अधिकाऱ्यांसह दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतशिवारात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.
महसूल प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत पंचनाम्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करून आवश्यक कार्यवाहीसाठी अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.


यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार उमा ढेकळे, कृषी अधिकारी, मंडळाधिकारी, तलाठी तसेच महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनीही दौऱ्यात सहभागी होत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
नाशिकच्या बैठकीतही मांडली शेतकऱ्यांची व्यथा
दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या विभागीय आढावा बैठकीतही आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर मतदारसंघातील पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती मांडली. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी विविध तांत्रिक बाबी आणि स्थानिक परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देत आवश्यक निकषांमध्ये सवलत देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.
महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी
अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने आमदार अनिल पाटील यांनी महिनाभरापूर्वीच शासनाकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.
यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन निवेदने सादर केली होती. अमळनेर व पारोळा तालुक्यांतील पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत त्यांनी शासनाला माहिती दिली होती.
सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर अमळनेर मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीची अपेक्षा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed