खदाणीत पडलेल्या पिता-पुत्राची पालिका पथकाने केली सुखरूप सुटका चोपडा रोडवरील घटनेत आरोग्य विभाग व अग्निशमन दलाची तत्परता; धाडसी बचावकार्याचे नागरिकांकडून कौतुक.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी चोपडा रोड परिसरातील खदाणीजवळ गणपती विसर्जनासाठी आलेले पिता-पुत्र अचानक खदाणीतील पाण्यात पडल्याची घटना घडली. वडिलांचा पाय घसरल्याने त्यांच्या हाताला धरून असलेला अंदाजे १० ते ११ वर्षांचा मुलगाही पाण्यात ओढला गेला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.


घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने अमळनेर नगरपरिषदेला कळविले. त्यानंतर नगरपालिका आरोग्य विभागाचे पथक आणि अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकाने कोणताही विलंब न करता बचावकार्य सुरू केले.
स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुकादम नितीन भावलाल बिऱ्हाडे, स्वप्नील विजय बिऱ्हाडे, गौतम सुरेश मोरे, समाधान वसंत केदार, आदर्श सुधाकर सोनवने, प्रवीण आनंदा बिऱ्हाडे, दिनेश अशोक संदानशिव, संदीप भिवसन गढरे, मुकेश अशोक संदानशिव, दीपक निळकंठ संदानशिव आणि सत्यम संदानशिव यांनी बचावकार्यात सहभाग घेतला.


तसेच अग्निशमन दलाचे भिका संदानशिव, फारुक शेख आणि दिनेश बिऱ्हाडे यांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पथकातील कर्मचाऱ्यांनी सतर्कता, धाडस आणि समन्वय साधत अथक प्रयत्न करून पाण्यात अडकलेल्या पिता-पुत्राला सुखरूप बाहेर काढले.
या बचावकार्यात स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक साहेब आणि मुकादम गोल्डी बिऱ्हाडे यांनी दाखविलेल्या धाडसाचे विशेष कौतुक होत आहे. संकटाची तीव्रता लक्षात न घेता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी बचावकार्यासाठी घेतलेली धाव नागरिकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली.
या घटनेत नगरपालिका आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकाने दाखविलेली तत्परता, धाडस आणि प्रसंगावधान यामुळे पिता-पुत्राचा जीव वाचला. बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed