माणुसकीचा गोडवा जपत मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम; दुष्काळग्रस्त कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची भर! अनोरे गावातून ‘माणुसकीची दिवाळी’ उपक्रमाचा शुभारंभ; खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते शेकडो गरजवंतांना फराळ वाटप.
अमळनेर /आबिद शेख 
अमळनेर : यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर दिवाळीचा सण साजरा करण्याचे आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत गरजू कुटुंबांच्या घरातही दिवाळीचा आनंद आणि गोडवा पोहोचावा, या सामाजिक भावनेतून मंगळग्रह सेवा संस्थेने ‘माणुसकीची दिवाळी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत घरोघरी दिवाळी फराळ वाटपाचा शुभारंभ गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील अनोरे गावातून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, सचिव प्रा. जयेश गुजराती, खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, रवींद्रसिंगजी कालरा आणि डॉ. रवींद्र जैन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री मंगळग्रह देवतेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीपासून सर्वांचे संरक्षण व्हावे, गावात सुख, समृद्धी व आरोग्य नांदावे, यासाठी मंदिराचे मुख्य पुरोहित शुभम वैष्णव गुरुजी व वैभव लोकाक्षी यांनी मंत्रोच्चारासह प्रार्थना केली.

प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी उपक्रमामागील सामाजिक भूमिका स्पष्ट केली. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी गरजूंना दिवाळी फराळ, कपडे आणि अन्नधान्याच्या स्वरूपात मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही दिली.

यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शासन नागरिकांच्या पाठीशी असून, शासकीय मदतीपासून कोणी वंचित राहिले असल्यास त्यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा. पात्र लाभार्थ्यांना शासनामार्फत शक्य ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
खासदार स्मिताताई वाघ यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना, ‘जेथे कमी तेथे आम्ही’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत असल्याचे सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरजूंच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. या उपक्रमाला रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच लोकप्रतिनिधींचेही भक्कम सहकार्य राहील. संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून इतरांनीही या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते आर्डी-अनोरे परिसरातील शेकडो गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाची पाकिटे वितरित करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंदिराचे सेवेकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनोरे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी भरभरून दाद देत संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम व मंगल सेवेकरी प्रकाश मेखा यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
अनोरे गावाची एकजुटीची परंपरा; पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक!
अनोरे हे आकाराने छोटे असले तरी सामाजिक एकोपा आणि गावाच्या विकासाच्या बाबतीत आदर्श ठरले आहे. गावात जाती-धर्मातील सलोखा, एकजूट आणि सामंजस्याची परंपरा असून, ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पनाही येथे जपली जाते. मात्र, एकेकाळी गावाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पाण्याअभावी शेती व्यवसायही संकटात सापडला होता.

ही परिस्थिती लक्षात घेऊन मंगळग्रह सेवा संस्थेने अनोरे गाव दत्तक घेतले. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत गावाला सहभागी करून घेत संस्थेने सामाजिक संस्था, कार्यकर्ते, शैक्षणिक संस्था, शासन आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने जलसंधारणासाठी व्यापक प्रयत्न केले. या सामूहिक मेहनतीला यश मिळून गावाने राज्यस्तरीय स्पर्धेत २५ लाख रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. याच गावाशी संस्थेचे विशेष नाते असल्याने ‘माणुसकीची दिवाळी’ या उपक्रमाचा शुभारंभ अनोरे येथून करण्यात आला.

