गणेशोत्सवात आपत्कालीन प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी नागरिकांना CPRचे धडे पोलीस, होमगार्ड व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना प्राथमिक उपचाराचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : गणेशोत्सवाच्या काळात मोठी गर्दी होत असल्याने अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हृदयविकाराचा झटका, श्वास गुदमरणे, चक्कर येणे किंवा अचानक व्यक्ती अत्यवस्थ होणे अशा प्रसंगी रुग्णालयात पोहोचेपर्यंत योग्य प्राथमिक उपचार मिळाल्यास जीव वाचविण्यास मोठी मदत होऊ शकते. याच उद्देशाने अमळनेर शहरातील नागरिक, पोलीस, होमगार्ड तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना CPR व प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले.

अमळनेर शहर पोलीस ठाणे, लायन्स क्लब अमळनेर आणि जय बजरंग मंडळ, पानखिडकी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. १६) रात्री ‘वेळीच उपचार शिका, जीवन वाचवा!’ या उपक्रमांतर्गत प्राथमिक उपचार व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जय बजरंग मंडळाच्या ठिकाणी झालेल्या शिबिराची सुरुवात उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या हस्ते गणरायाची आरती करून करण्यात आली. त्यानंतर आपत्कालीन वैद्यकीय सेवा तज्ज्ञ डॉ. विक्रांत पाटील आणि डॉ. मिलिंद नवसारीकर यांनी विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये करावयाच्या प्राथमिक उपचारांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी हृदयविकाराचा झटका आल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, CPR कशा पद्धतीने द्यावा, श्वास गुदमरल्यास काय करावे, चक्कर अथवा भुरळ आल्यास कोणती काळजी घ्यावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. तसेच रुग्णवाहिका, पोलीस आणि डॉक्टरांना तातडीने माहिती देऊन मदत पोहोचेपर्यंत रुग्णाला सुरक्षितपणे प्राथमिक उपचार कसे द्यावेत, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मिरवणुका वेळेत काढून विसर्जनाचे नियोजन वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. वेळेत मिरवणूक काढल्यास विसर्जनासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होऊन उत्सव शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडता येईल, असे त्यांनी सांगितले.
शिबिराला उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, PSI भगवान कोळी, पोलीस कर्मचारी सिद्धांत शिसोदे, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, सचिव जयेश गुजराथी, डॉ. रविंद्र कॉलरा, मनीष जोशी, विनोद अग्रवाल, महेंद्र पाटील, जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष सागर वाघ, नगरसेवक गोपी कासार, सूरज परदेशी, शैलेश पाटील, हरीश भावसार, हर्षल विसपुते, किरण भावसार, प्रसाद करंजे, आदित्य भावसार, बाळू जाधव यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक, पोलीस व होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.

