अमळनेरात तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धांचा थरार; १३ शाळांतील १३० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
अमळनेर /आबिद शेख

अमळनेर : नोबल पोदार लर्न स्कूल, अमळनेर येथे शासकीय शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील १३ शाळांमधील सुमारे १३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगरसेविका स्वप्ना पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तिलोत्तमाताई पाटील आणि तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ यांच्या हस्ते माँ सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेत अमळनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, परिश्रम आणि जिद्दीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. खेळातून शिस्त, संयम आणि खिलाडूवृत्ती जोपासत देशाचा मानसन्मान वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून अरुण प्रभाकर सपकाळे, शेख सर, कैलास बाविस्कर, जितेंद्र जेठवा, पोदार स्कूलचे क्रीडा शिक्षक अर्शद शेख, जयेश मासरे आणि प्रितेश तुरणकर यांनी जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाला वामन चव्हाण, भास्कर चौधरी, शाळेचे प्राचार्य रमण कुमार, प्रशासकीय अधिकारी योगेश पाटील यांच्यासह सहभागी शाळांचे शिक्षक, कर्मचारी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या चेअरमन डॉ. श्रीमती अर्चना प्रशांत सूर्यवंशी आणि प्रशांत भगवान सूर्यवंशी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी भविष्यात विविध क्रीडा प्रकारांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या क्रीडा कौशल्याला वाव द्यावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

