पाण्याच्या हौदात पडलेल्या दोन वर्षीय शिवला मिळाले नवजीवन; डॉक्टरांच्या सेवाभावामुळे वाचला चिमुकल्याचा जीव ऊसतोड कामगार कुटुंबातील बालकावर मोफत उपचार; नव्या कपड्यांचीही दिली मायेची भेट.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : घराजवळ खेळता खेळता जनावरांसाठी असलेल्या पाण्याच्या हौदात पडलेल्या अवघ्या दोन वर्षीय चिमुकल्या शिव विश्वास भिक (रा. ढेकू) याला वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे नवजीवन मिळाले. गंभीर अवस्थेत असलेल्या शिववर अमळनेर येथील डॉ. शरद बाविस्कर यांच्या कस्तुरबा बालरुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. बालकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे लक्षात घेऊन डॉ. बाविस्कर यांनी त्याच्यावर मोफत उपचार करून सामाजिक बांधिलकी जपली.


शिव घराजवळ खेळत असताना अचानक जनावरांसाठी असलेल्या पाण्याच्या हौदात पडला. काही वेळाने बालक घरात दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या आईने परिसरात शोध सुरू केला. शोध घेत असताना शिव हौदात पडल्याचे निदर्शनास आले. आईने तातडीने त्याला हौदातून बाहेर काढले.


बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने डॉ. अनिल शिंदे व डॉ. संदीप जोशी यांच्याकडे नेण्यात आले. तेथे प्राथमिक जीवनावश्यक उपचार करण्यात आले. पुढील उपचारांसाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने कुटुंबीयांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. शरद बाविस्कर यांनी शिवला आपल्या कस्तुरबा बालरुग्णालयात दाखल करून घेतले.
अथक प्रयत्नांनी चिमुकल्याला जीवदान
शिवची अवस्था गंभीर असल्याने उपचाराचे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर होते. मात्र, बालकाचा जीव वाचवण्याच्या उद्देशाने डॉ. बाविस्कर व त्यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. आवश्यक वैद्यकीय उपचार आणि सततच्या देखरेखीनंतर शिवच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. उपचार पूर्ण झाल्यानंतर बालक सुखरूप झाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आर्थिक परिस्थिती पाहून उपचाराचा खर्चही घेतला नाही
शिवचे वडील ऊसतोड कामगार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा परिस्थितीत गंभीर आजारावरील उपचाराचा खर्च करणे कुटुंबासाठी मोठे आव्हान ठरू शकले असते. मात्र, डॉ. शरद बाविस्कर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत बालकावर विनामूल्य उपचार केले.
उपचारासोबत चिमुकल्याला नव्या कपड्यांची मायेची भेट
शिवची प्रकृती सुधारल्यानंतरही डॉ. बाविस्कर यांनी केवळ वैद्यकीय उपचारापुरतीच आपली जबाबदारी मर्यादित ठेवली नाही. बालकाच्या आनंदासाठी त्यांनी त्याला नवे कपडे घेऊन दिले. या मायेच्या कृतीमुळे शिवच्या आई-वडिलांचे डोळे पाणावले.
“डॉक्टरांनी आमच्या मुलाला नवजीवन दिले. आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी मोफत उपचार केले आणि मुलाला नवीन कपडेही दिले. त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही,” अशी भावना शिवच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.
या घटनेतून वैद्यकीय सेवेसोबतच माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचे दर्शन घडले. गरीब ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील चिमुकल्याला गंभीर अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी डॉ. शरद बाविस्कर व त्यांच्या वैद्यकीय पथकाने केलेल्या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed