सूक्ष्म सिंचनासाठी एससी-एसटी शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम; १५ ऑक्टोबरपर्यंत महाडीबीटीवर अर्जाची संधी.

0

24 प्राईम न्यूज 17 Sep 2026


जळगाव, दि. १६ सप्टेंबर : राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पिक’ (सूक्ष्म सिंचन) अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी कृषि विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.


या योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के, तर बहुभूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देय आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून त्यावर अतिरिक्त पूरक अनुदानाची तरतूद आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत पूरक अनुदान मिळत असल्याने पात्र लाभार्थ्यांना मापदंडानुसार कमाल ९० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते.
सन २०२६-२७ साठी या प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर निधी उपलब्ध आहे.

मात्र महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने कृषि विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांकडे मालकीचा ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणेही बंधनकारक आहे. शेतात सिंचनाची सुविधा असणे आवश्यक असून त्याची नोंद ७/१२ वर असावी. नोंद नसल्यास विहीर, शेततळे आदी सिंचन सुविधांबाबत स्वयंघोषणापत्र सादर करता येईल. योजनेचा लाभ कमाल ५ हेक्टर क्षेत्रापर्यंत देण्यात येणार आहे.
लाभार्थी निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला लघुसंदेशाद्वारे माहिती देण्यात येईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकाकडून सूक्ष्म सिंचन संच खरेदी करावा लागेल. संच बसवल्यानंतर कृषि पर्यवेक्षकामार्फत तपासणी केली जाईल आणि पात्र अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
या विशेष मोहिमेत गावागावात मेळावे घेऊन शेतकऱ्यांना योजनेची माहिती देण्यात येणार आहे. मंडळ कृषि अधिकारी व उप कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषि अधिकारी ही कार्यवाही करणार आहेत. अर्ज भरताना अचूक माहिती व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, जेणेकरून अर्ज त्रुटींमुळे रद्द होणार नाही, असेही कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा CSC केंद्राशी संपर्क साधावा. एससी-एसटी प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबरपूर्वी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed