अमळनेरमध्ये मालमत्ता कर आकारणीवरून संताप; ‘कोअर प्रोजेक्ट’चा मक्ता रद्द करण्याची मागणी.

0

अमळनेर | आबिद शेख 

 

अमळनेर शहरातील नवीन मालमत्तांवर सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या मालमत्ता कर आकारणीवरून आता नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या कर आकारणीसंदर्भातील सुनावणी सध्या नगररचना विभागाच्या (TP) अधिकाऱ्यांमार्फत सुरू असून, या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव यांनी नागरिकांना एकत्र येऊन आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे.

संदानशिव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर नगरपरिषदेकडून ‘कोअर प्रोजेक्ट, अमरावती’ यांना दिलेल्या निविदेच्या माध्यमातून शहरातील नवीन मालमत्तांची मोजणी करून मोठ्या प्रमाणात कर आकारणी करण्यात आली आहे. या प्रक्रियेत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांच्या निविदेचा उल्लेख त्यांनी केला आहे. सदर कर आकारणीची प्रक्रिया नेमकी कोणत्या पद्धतीने करण्यात आली, तसेच त्यामध्ये नागरिकांवर लादण्यात आलेल्या कराची योग्यताही तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


कर आकारणी करताना खासगी व्यक्तींमार्फत मोजणी करण्यात आल्याचा आरोपही संदानशिव यांनी केला असून, सदर प्रक्रियेची पारदर्शकता आणि वैधता याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सुनावणीत नागरिकांना मिळणारी सवलत मर्यादित असल्याने करदात्यांनी वेळीच या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेषतः कॉलनी भागातील नागरिकांना कर भरावा लागत असताना अनेक ठिकाणी अद्याप गटारी, रस्ते आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. सुविधा अपुऱ्या असताना मोठ्या प्रमाणात कर आकारणी होत असल्यास नागरिकांनी त्याबाबत प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


‘कोअर प्रोजेक्ट, अमरावती’ यांना देण्यात आलेला मक्ता रद्द करून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत नव्याने मोजणी करावी आणि त्यानंतर नियमानुसार मालमत्ता कर आकारणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी नागरिकांनी समितीच्या माध्यमातून संघटित होऊन आंदोलन उभारावे, असे आवाहनही संदानशिव यांनी केले आहे.
“कोअर प्रोजेक्ट कंपनीला दिलेल्या कामाचा खर्च अखेर नागरिकांनाच कराच्या माध्यमातून भरावा लागणार आहे. त्यामुळे या विषयावर नागरिकांनी वेळीच विचार करून आपली भूमिका मांडावी,” असे जाहीर आवाहन सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed