ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग.

0

अमळनेर/आबिद शेख


अमळनेर : पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अमळनेर शहरात भव्य जुलूस काढण्यात आला. या जुलूसमध्ये मुस्लिम समाजातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


दुपारी २ वाजेनंतर शहरातील विविध भागांतून जुलूस निघण्यास सुरुवात झाली. कसाली मोहल्ला, शाहआलम नगर, इस्लामपुरा, झामी चौक, पान खिडकी, अंदरपुरा, बाहरपुरा, गांधलीपुरा, जापान जिन, श्रद्धानगर, जोशीपुरा, मिलचाळ, तांबेपुरा यासह विविध परिसरातील नागरिक जुलूसमध्ये सहभागी झाले.


जुलूसमध्ये नागरिकांच्या हातात इस्लामी झेंडे होते. नात-ए-पाकचे पठण करत पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त करण्यात आली. संपूर्ण मार्गावर उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरण पाहायला मिळाले.
ईदगाह मैदानावर असरची नमाज
सायंकाळी सुमारे ५ वाजता जुलूस ईदगाह मैदानावर पोहोचला. याठिकाणी समाजबांधवांनी एकत्रितपणे असरची नमाज अदा केली. जुलूसाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मस्जिदी व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई
ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून विविध तयारी सुरू होती. अनेक मस्जिदी तसेच मोहल्ल्यांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी रोषणाईने सजलेली धार्मिक स्थळे आणि परिसर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
जयनील फाउंडेशनतर्फे पाण्याच्या बाटल्यांचे वाटप
जुलूसमध्ये सहभागी नागरिकांसाठी जयनील फाउंडेशनतर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पाच कंदील चौक येथे जुलूसमध्ये सहभागी नागरिकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. उन्हाच्या वातावरणात पाण्याची व्यवस्था केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
पोलीस प्रशासनाचा सत्कार
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वानिमित्त शहरात शांतता, सुव्यवस्था आणि भाईचारा कायम राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी Dy. SP विनायक कोते तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक मुख्तार खाटीक, माजी नगरसेवक फिरोज मिस्तरी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जनाब नासिर हाजी, जितू भाऊ ठाकूर, वरुण पाटील, शकील काझी, अझहर सय्यद, जुनेद शेख, मोईज सय्यद, जाकीर शेख, अस्लम तेलोरे, नबी दादा, अझहर शेख, वसीम पठाण, उझैफ पठाण यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
ईद मिलादुन्नबीचा जुलूस शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अमन, शांती आणि एकतेचा संदेश देत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जुलूस यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि समाजबांधवांनी दिलेले सहकार्य कौतुकास्पद ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed