सीडबॉल निर्मितीतून जय योगेश्वर विद्यालयाचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : जय योगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथे पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरण साक्षरतेचा संदेश देण्यासाठी २५ ऑगस्ट २०२६ रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीडबॉल निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमशील शिक्षिका स्मिता सुखदेवराव वानखडे यांनी विद्यार्थ्यांना सीडबॉलचे महत्त्व समजावून सांगत प्रत्यक्ष कृतीतून त्याची निर्मिती करून घेतली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक के. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. संशोधक मार्गदर्शिका प्रा. डॉ. नयना वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता वानखडे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण साक्षरता रुजविण्यासाठी विविध उपक्रम घेत आहेत.

यावेळी स्मिता वानखडे यांनी सीडबॉल म्हणजे काय, ते कसे तयार केले जाते आणि पर्यावरण संवर्धनात त्याचे महत्त्व काय आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सीडबॉल तयार करण्यासाठी काळी सुपीक माती, चिकणमाती, सेंद्रिय खत, कंपोस्ट खत व गांडूळ खत यांचे योग्य मिश्रण करून त्यामध्ये विविध देशी वृक्षांच्या बियांचा समावेश करून गोळे तयार करण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले.

पावसाळ्यात हे सीडबॉल डोंगर-दऱ्या, मोकळ्या अथवा पडीत जमिनीवर टाकल्यास पावसाच्या पाण्यामुळे त्यातील माती विरघळते आणि बियांना अंकुर फुटून नैसर्गिकरित्या रोपांची निर्मिती होते, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः सीडबॉल तयार करून या पर्यावरणपूरक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमात विद्यालयातील इयत्ता बारावीचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सीडबॉलच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा हा उपक्रम ठरला.

