अमळनेर तालुक्यातील रखडलेली घरकुले पूर्ण करा; लाभार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढा! क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला निवेदन; रखडलेले अनुदान व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी.
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर : अमळनेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांना विविध प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. निधीअभावी तसेच अनुदानाचे हप्ते रखडल्याने अनेकांची घरकुले अपूर्ण राहिली आहेत. या समस्यांची तातडीने दखल घेऊन लाभार्थ्यांना दिलासा द्यावा आणि अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे.

यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद जळगाव येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना निवेदन सादर केले. यामध्ये घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावणे, रखडलेले अनुदान व हप्ते तातडीने वितरित करणे, पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांचा जलद निपटारा करणे आणि तांत्रिक अडचणींमुळे अपूर्ण राहिलेल्या घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली.
शासनाच्या विविध घरकुल योजनांचा मुख्य उद्देश गरीब, गरजू आणि बेघर कुटुंबांना हक्काचे निवासस्थान उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, प्रशासकीय दिरंगाई आणि निधीच्या अडचणींमुळे लाभार्थ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि प्रलंबित कामांना गती द्यावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.
यावेळी ईश्वर उखा पाटील, योगराज निंबा कोळी, शरद विनायक पाटील, प्रकाश बोरसे, कृष्णा पाटील, रामदास पाटील, दिलीप मधुकर चौधरी आणि भूषण गोपीचंद कोळी उपस्थित होते.
घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच तालुक्यातील सर्व अपूर्ण घरकुलांची कामे पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

