अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकेन : डॉ. दिगंबर महाले.- राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. महाले यांचा विविध संघटनांतर्फे सत्कार.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : “अमळनेर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. येथील पाणी, उद्योग आणि आरोग्याचे प्रश्न मला चांगलेच माहीत आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी मी जीव ओवाळून टाकेन,” असा भावनिक निर्धार व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. दिगंबर (राजू) महाले यांनी व्यक्त केला.
व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमळनेरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांच्या वतीने डॉ. महाले यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिशा संदानशिव, उषा देवरे आणि डी. ए. पाटील यांनी महात्मा फुले यांचे गीत सादर केले. यानंतर विविध मान्यवरांनी डॉ. दिगंबर महाले यांच्या पत्रकारिता तसेच शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव केला.

मराठा सेवा संघाचे अशोक पाटील, बहुजन समाज पार्टीचे गौतम मोरे, अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीचे रियाज मौलाना, धनदाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. लीलाधर पाटील, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, राष्ट्रीय कला मंचचे अजय भामरे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे भीमराव महाजन आणि युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी डॉ. महाले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विचारपीठावर महिला पतंजली योग समितीच्या माधुरी पाटील यांच्यासह पुरोगामी क्रांती दल, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्र सेवा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

