अमळनेरच्या जलवाहिनीला ९६ लाखांचा निधी; काम पूर्ण होताच पालिकेच्या खात्यात निधी जमा आमदार अनिल पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे मानले आभार.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरी नदीला आलेल्या महापुरात अमळनेर शहराच्या पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटावर अखेर तोडगा निघाला आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर या कामासाठी डीपीडिसीच्या माध्यमातून ९६ लाख रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अमळनेरकरांच्या वतीने आभार मानले आहेत.

बोरी नदीपात्रात पुलाखाली असलेली शहराची मुख्य जलवाहिनी पुराच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागला. जलवाहिनी पुन्हा टाकण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती; मात्र पालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा खर्च करणे अडचणीचे ठरत होते.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील अमळनेर येथे आले असता आमदार अनिल पाटील यांनी शहराच्या पाणीप्रश्नाची गंभीरता त्यांच्या निदर्शनास आणून देत डीपीडिसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. दोन्ही मंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
पालिकेच्या माध्यमातून खाजगी ठेकेदाराकडून जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. तब्बल २२ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर २२ ऑगस्ट रोजी हे काम पूर्ण झाले. त्यानंतर पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. जलकुंभ भरल्यानंतर दीर्घ प्रतीक्षेनंतर अमळनेरकरांच्या नळाला पुन्हा पाणी पोहोचले.
दरम्यान, काम पूर्ण होताच या कामासाठी डीपीडिसीतून मंजूर करण्यात आलेला ९६ लाख रुपयांचा निधी पालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांना भ्रमणध्वनीवरून दिली.
निधी उपलब्ध करून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे जाहीर आभार मानले. या निधीमुळे अतिवृष्टीत बाधित झालेल्या शहराच्या महत्त्वपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीचा आर्थिक भार पालिकेवर राहणार नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

