सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयोगाची आढावा बैठक सुरक्षा साहित्यापासून घरकुल, पेन्शन व वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांवर चर्चा.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : नगरपरिषद अमळनेर येथे दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मा. श्री. मुकेशजी सारवान यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध अडीअडचणींबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक मा. श्री. राजेशजी सोनवणे उपस्थित होते.


बैठकीत अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. श्री. नागेशजी कंडारे तसेच संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष मा. श्री. अनिल बेंडवाल यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आयोगाचे उपाध्यक्ष तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. गणेशजी शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

9
यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साहित्य, झाडू, तगारी, फावडी, हँड ग्लोव्हज, मास्क आदी साहित्य वेळेवर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे उपलब्ध करून देणे, शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना घरांचा मालकी हक्क देऊन घरभाडे बंद करणे, या मागण्यांवरही चर्चा झाली.
सन २००५ नंतर सेवेत रुजू होऊन सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाची रक्कम व इतर प्रलंबित देयके तात्काळ मिळावीत, तसेच काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीमधून नगरपरिषदेने परस्पर जमा केलेल्या रकमा संबंधितांना परत मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय सर्व सफाई कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत करणे, सन २००५ नंतर सेवेत रुजू होऊन वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेले अथवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासन निर्णयानुसार पेन्शन व इतर योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच लाड-पागे वारसा हक्काची जुनी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून पात्र वारसांना नियुक्ती आदेश देणे, या मागण्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा केली. यावेळी इतर विविध विषयांवरही विचारविनिमय करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed