गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमास सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार.

0

अमळनेर /आबिद शेख 


अमळनेर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधि राखण्यासाठी अमळनेर पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शाह आलम नगर येथील इम्रान शेख सलीम (वय २७) याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून, त्याला सहा महिन्यांसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर यांनी दिला आहे.

शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमळनेर पोलिसांनी दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय निकम यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले.


यादरम्यान इम्रान शेख सलीम याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तसेच त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांच्या माध्यमातून त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर यांच्याकडे सादर करण्यात आला.
प्रस्तावाची चौकशी व दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचार करून संबंधित प्राधिकाऱ्यांनी इम्रान शेख सलीम याला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचा आदेश पारित केला. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अमळनेर उपविभाग यांच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, शहरात वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होऊन शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कायदा हातात घेणाऱ्या तसेच शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed