युवा वर्गाला रोटरीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शनाची गरज : खासदार ॲड. उज्ज्वल निकम.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : रोटरीच्या माध्यमातून समाजसेवेबरोबरच भरकटलेल्या युवा वर्गाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम हाती घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मश्री खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण समारंभ नर्मदा रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला. यावेळी खासदार ॲड. उज्ज्वल निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रोटे. ॲड. रुपेश पाटील व रोटे. गनी मेमन यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी परिवारातील दिवंगत सदस्य तसेच साने गुरुजी स्मारकाचे संस्थापक माजी प्राचार्य अरविंद सराफ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मावळते अध्यक्ष रोटे. देवेंद्र कोठारी यांनी मागील वर्षातील कार्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर त्यांनी नूतन अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांच्याकडे कॉलर, रोटरी चार्टर व हॅमर प्रदान करून पदभार सोपविला. मावळते सचिव रोटे. आशिष चौधरी यांनी सचिवपदाची जबाबदारी रोटे. प्रशांत निकम यांच्याकडे सोपविली.
असिस्टंट गव्हर्नर ॲड. रुपेश पाटील यांनी RI डिस्ट्रिक्ट 3030 चे गव्हर्नर डॉ. राजेश पाटील यांचा संदेश वाचून दाखविला. प्रमुख पाहुणे खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते रोटे. मकसूद बोहरी संपादित ‘सेवाचक्र’ रोटरी बुलेटीनचे विमोचन करण्यात आले.


RI डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये रोटरी इन्क्लेव्ह म्हणून रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची सेक्रेटरी, तर रोटे. प्रीतपाल सिंग बग्गा यांची जॉईंट सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली. दोघांचाही खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ॲड. उज्ज्वल निकम म्हणाले की, समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून रोटरीचे काम जगभर सुरू आहे, ही समाधानाची बाब आहे. रोटरीकडून रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यांसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र, आजचा युवा वर्ग काही प्रमाणात भरकटलेला दिसत असून त्याला योग्य मार्गदर्शन व समुपदेशनाची आवश्यकता आहे. हे काम रोटरीने हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
रोटे. गनी मेमन यांनी वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि त्यासाठी ३ ते ५ वर्षांपर्यंत प्रतीक्षा यादी लागण्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. मुलांनी आई-वडिलांची जबाबदारी घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. अजय रोडगे, रोटे. प्रतीक जैन व रोटरी ॲनी. आरती रेजा यांनी केले. आभार रोटे. प्रशांत निकम यांनी मानले. रोटरी ॲनी. पूर्वा वशिष्ठ यांनी पसायदान सादर केले.
यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, सौ. ज्योती निकम, धरणगाव, पारोळा, चोपडा येथील रोटरी पदाधिकारी, लायन्स क्लब, अमळनेर वकील संघ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, श्री मंगलग्रह मंदिराचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले, खाशी मंडळाच्या माधुरीताई पाटील, नीरज अग्रवाल, मनोहर निकम, ॲड. विलास वाणी, ॲड. मनोहर पवार, ॲड. तीलोत्तमा पाटील, सौ. भारती सोनवणे यांच्यासह शहरातील मान्यवर, व्यापारी, रोटरी परिवार व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– रोटे. मकसूद बोहरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed