पाणीप्रश्नावर आमदार अनिल पाटलांची अधिकाऱ्यांना तंबी दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; नागरिकांना आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष पाणी देण्याचा इशारा.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहरातील गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आमदार अनिल पाटील यांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. नागरिकांच्या पाण्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत त्यांनी मुख्याधिकारी तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत दोन दिवसांत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा अल्टिमेटम दिला.

शहरातील विविध भागांत नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक नागरिकांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे धाव घेत पाणीप्रश्न मांडला. त्यानंतर आमदारांनी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी, “नुसती आश्वासने देऊ नका, नागरिकांना प्रत्यक्ष पाणी मिळाले पाहिजे,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. दोन दिवसांत संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आपण स्वतः पालिकेत येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
आमदारांच्या या भूमिकेनंतर पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिल्याचे समजते. आता प्रशासनाकडून दोन दिवसांत कोणती ठोस उपाययोजना केली जाते आणि नागरिकांना प्रत्यक्ष पाणी कधी मिळते, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.

