शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची राजपूत एकता मंचाची मागणी.
अमळनेर आबिद शेख

अमळनेर : शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांचा निषेध करत अमळनेर तालुका राजपूत एकता मंचाच्या वतीने प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देण्यात आले. संबंधित घटनांतील दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मंचाने केली.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) यांच्यावर काही ग्रामस्थांनी मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी पळत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी (वय ३१) हे ७ ऑगस्ट रोजी पथदिव्यांची दुरुस्ती करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

या दोन्ही घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करावी. कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
राजपूत समाजातील दोन्ही पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशीही मागणी मंचाने केली. कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांमुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्यासोबतच प्रशासनाच्या कामकाजावरही विपरीत परिणाम होत असल्याचे मंचाने नमूद केले.
प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मंचचे अध्यक्ष रणजित पाटील, अनिल पाटील, चेतन राजपूत, जयराम पाटील, विलास पाटील, जयदीप पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, अमोल राजपूत, कुणाल गिरासे, भोजराज राजपूत, दिलीप पाटील, रोहिदास पाटील, विक्रम पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील, प्रकाश पाटील, समाधान धनगर, अजयसिंग पाटील, आशिष राजपूत, भरतसिंग पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

