दोन-चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा; जितेंद्र ठाकूरांचा इशारा टेंडरचा हव्यास, पाणीवाटपातील कथित भेदभाव आणि सोशल मीडियावरील दिखाव्यावर ठाकूरांचा घणाघात.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर  : शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ३१ जुलै रोजी आलेल्या पुरात काही पाईप वाहून गेले होते. त्यांची तात्पुरती दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देता आला असता; मात्र कामाला विलंब झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र (जितू) ठाकूर यांनी केला आहे. येत्या दोन ते चार दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अमळनेरकरांना सोबत घेऊन नगरपरिषदेवर जनमोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.


ठाकूर यांनी म्हटले आहे की, २७ ते २८ जुलैदरम्यान शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाल्यानंतर अनेक भागांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नागरिक एक-एक थेंबासाठी वणवण करत असताना पालिका पदाधिकारी व प्रशासनाकडून सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दाखवले जात असल्याची टीका त्यांनी केली.


जर काम खरोखरच युद्धपातळीवर सुरू असेल, तर अधिक मजूर लावून दिवस-रात्र काम करून पाईपलाईन लवकर सुरू का करण्यात आली नाही, असा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजेचा असलेल्या पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाणीवाटपात पक्षपाताचा आरोप
बायपास लाईनवरून सुरू असलेल्या पाणीवाटपात कथित भेदभाव होत असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला आहे. काही भागात दररोज काही मिनिटे पाणी मिळत असताना अनेक भागांतील नागरिकांना गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाण्याचा थेंबही मिळालेला नाही, असा दावा त्यांनी केला.
पाईपलाईन दुरुस्ती झाल्यानंतरही टाक्या भरून रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा करण्यास विलंब होण्याची शक्यता असून काही भागांना २२, २५, २८ दिवस किंवा त्याहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
पालिकेने टँकरद्वारे मोफत पाणी द्यावे
शहराला पाणीपुरवठा करणे ही नगरपरिषदेची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीला विलंब होत असताना पालिकेने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करणे आवश्यक होते, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
पालिकेच्या अनुपस्थितीत जयनील फाउंडेशनसारख्या संस्थेला स्वतःच्या खर्चाने टँकरद्वारे नागरिकांची तहान भागवावी लागत असल्याचे सांगत त्यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.
पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणीपट्टी न भरण्याचे आवाहन
पालिकेकडून दरवर्षी पाणीपट्टी वसूल केली जाते. मात्र नागरिकांना पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी पाणीपट्टी न भरता वसुलीसाठी येणाऱ्या पथकाला आधी पाण्याचा जाब विचारावा, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.
पाण्याचा प्रश्न राजकारणाचा विषय नाही’
पाण्याच्या प्रश्नावर कोणतेही राजकारण करण्याचा हेतू नसून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. विरोधकही या कामात सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
“अमळनेरची जनता संयमी आहे; मात्र तिच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. नागरिकांचे सातत्याने फोन येत असल्याने हा जाब विचारावा लागत आहे. दोन ते चार दिवसांत शहराला पाणी मिळाले नाही, तर सर्व जनतेला सोबत घेऊन नगरपरिषदेवर मोर्चा काढला जाईल,” असा इशारा ठाकूर यांनी दिला.
पाईपलाईन सुरू झाल्यानंतर फोटोसेशनवरही टीका
पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर श्रेय घेण्यासाठी फोटोसेशन व सोशल मीडिया पोस्टचा धडाका सुरू होण्याची शक्यता असल्याची टीकाही ठाकूर यांनी केली आहे.
“जनतेला पाणी हवे आहे, उद्घाटनाचा सोहळा नाही. नागरिकांची तहान भागवणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी फोटोसेशन करून उपकार केल्याचा आव आणण्याची गरज नाही,” असे ठाकूर यांनी सुनावले.
दरम्यान, ठाकूर यांनी केलेल्या आरोपांबाबत नगरपरिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed