प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांची आयईईई महाराष्ट्र विभागाच्या चेअरमनपदी सन्मानपूर्वक निवड.
24 प्राईम न्यूज 8 Aug 2026

मुंबई, दि. ८ ऑगस्ट — आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स’ (आयईईई) च्या महाराष्ट्र विभागाच्या
चेअरमनपदी प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांची नुकतीच सार्वत्रिक
निवडणुकीद्वारे सन्मानपूर्वक निवड झाली आहे. या निवडीमुळे महाराष्ट्रातील
अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रात एका नव्या पर्वाची सुरुवात होत
असल्याची भावना शैक्षणिक व तांत्रिक वर्तुळांत व्यक्त होत आहे.

डॉ. पाटील हे सध्या मुंबईतील ऐटलास स्किलटेक विद्यापीठाच्या ‘यूजीडीएक्स
स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी’ या विभागाचे प्राध्यापक व संचालक म्हणून कार्यरत
असून, बी.टेक अभ्यासक्रमांचे व्यवस्थापान ते समर्थपणे सांभाळत आहेत.

अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव सुमारे अठ्ठावीस वर्षांचा
असून, या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाशी संलग्न
विविध शैक्षणिक संस्थांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
आयईईई व ‘असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी’ (एसीएम) या दोन्ही
आंतरराष्ट्रीय संस्थांचे ज्येष्ठ सदस्यत्व (सीनियर मेंबर) डॉ. पाटील
यांच्याकडे असून, ब्रिटनस्थित ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड
टेक्नॉलॉजी’ (आयईटी), ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड
टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स’ (आयईटीई), ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स
इंडिया’ (आयईआय) आणि ‘इन्स्टिट्यूशन ऑफ बायोइंजिनिअर्स’ (आयबीई) या
नामांकित संस्थांचे ‘फेलो’ हा प्रतिष्ठेचा दर्जाही त्यांना प्राप्त आहे.
आयईईई कॉम्प्युटर सोसायटीने त्यांना सन २०२५ करिता ‘डिस्टिंग्विश्ड
व्हिजिटर’ तर सन २०२४ करिता ‘डिस्टिंग्विश्ड कॉन्ट्रिब्युटर’ या मानाच्या
सन्मानांनी गौरविले आहे.
शंभराहून अधिक शोधनिबंध, सात ग्रंथांचे लेखन आणि आयईईई ऍक्सेस, आयईईई
सेन्सर लेटर्स, आयईईई डेटा डिस्क्रिप्शन्स तसेच नेचर पोर्टफोलिओअंतर्गत
प्रकाशित होणाऱ्या सायंटिफिक रिपोर्ट्स या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतील
संपादकीय जबाबदाऱ्या, ही डॉ. पाटील यांच्या संशोधन योगदानाची साक्ष
देतात. सिग्नल प्रोसेसिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र-अध्ययन,
रोबोटिक्स, मेकाट्रॉनिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि डेटा सायन्स या विषयांत
त्यांनी केलेले संशोधन कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते.
आयईईई मुंबई व महाराष्ट्र विभागाशी डॉ. पाटील यांचा संबंध अनेक
वर्षांपासूनचा आहे. यापूर्वी त्यांनी कम्युनिकेशन्स सोसायटी अध्यक्ष,
आरएफआयडी कौन्सिलचे सदस्यत्व उपाध्यक्ष, सचिव-कोषाध्यक्ष तसेच
सल्लागार-संपर्क अधिकारी अशा विविध पदांवर राहून संघटनेच्या वाढीसाठी
योगदान दिले आहे. नुकतेच त्यांनी अटलास स्किलटेक विद्यापीठात
‘अटलास-आयईटी ऑन कॅम्पस चॅप्टर’चे उद्घाटनही केले होते.
अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. पाटील यांनी आयईईई महाराष्ट्र
विभागातील सर्व स्वयंसेवक, ज्येष्ठ पदाधिकारी व सदस्यांप्रती कृतज्ञता
व्यक्त करत, विभागाला अधिक व्यापक व नवोन्मेषी दिशेने नेण्याचा संकल्प
व्यक्त केला. तंत्रज्ञान शिक्षण, संशोधन आणि उद्योग यांच्यातील परस्पर
सहकार्य अधिक बळकट करण्यावर आपला भर राहील, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. पाटील यांच्या या यशामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी शिक्षण
क्षेत्रात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या
नेतृत्वाखाली आयईईई महाराष्ट्र विभाग नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास
तंत्रज्ञान व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

