खान्देश एक्स्प्रेस १२ ऑगस्टला अमळनेरहून सुटणार; भुसावळ-अमळनेर दरम्यान सेवा रद्द.
अमळनेर | आबिद शेख

भादली रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या नॉन-इंटरलॉकिंगच्या महत्त्वपूर्ण कामाचा परिणाम खान्देश एक्स्प्रेसच्या संचालनावर झाला आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजी भुसावळ-दादर खान्देश एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने निर्णयात बदल केला असून, आता ही गाडी अमळनेर स्थानकापासून पुढे चालविण्यात येणार आहे.

नव्या निर्णयानुसार, भुसावळ ते अमळनेर या मार्गावरील खान्देश एक्स्प्रेसची सेवा १२ ऑगस्ट रोजी रद्द राहणार असून, अमळनेरहून पुढे गाडी नियोजित मार्गावर धावणार आहे.
इगतपुरी-भुसावळ रेल्वेमार्गादरम्यान भादली ते जळगाव पाचव्या रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे.

या प्रकल्पांतर्गत भादली स्थानकाच्या यार्डची पुनर्रचना तसेच पाचव्या रेल्वेमार्गासाठी आवश्यक जोडणीचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी नॉन-इंटरलॉकिंगची प्रक्रिया सुरू असून, त्याचा तात्पुरता परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, गाडी क्रमांक १९००३ दादर-भुसावळ खान्देश एक्स्प्रेस १२ ऑगस्ट रोजी दादरहून सुटल्यानंतर अमळनेर स्थानकापर्यंतच धावणार आहे. त्यामुळे अमळनेर आणि परिसरातील प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, प्रवाशांनी १२ ऑगस्ट रोजी प्रवासाचे नियोजन करताना गाडीच्या बदललेल्या संचालनाची माहिती लक्षात घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले

