15 वा वित्त आयोगाच्या निधीतील कथित अपहारासह अनियमिततेचे आरोप; ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : 15 वा वित्त आयोगाच्या निधीतील संशयित अपहार, ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता, कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न करणे, ग्रामपंचायतीचा कार्यभार हस्तांतरित न करणे तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याच्या आरोपांवरून अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी नितीन देविदास मराठे यांच्यावर जिल्हा परिषद जळगाव प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली
जिल्हा परिषद जळगावच्या ग्रामपंचायत विभागाकडून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील नियम 3(1) अन्वये हा आदेश काढण्यात आला आहे. पंचायत समिती अमळनेरचे गटविकास अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.

नितीन मराठे हे ग्रामपंचायत चौबारी व सबगव्हाण, ता. अमळनेर येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या विरोधात 15 वा वित्त आयोगाच्या निधीचा संशयित अपहार केल्याचा आरोप असून, संबंधित ग्रामपंचायतींमधील कामकाजात अनियमितता झाल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच कर वसुली 70 टक्क्यांपर्यंत न करणे, ग्रामपंचायतीचा कार्यभार हस्तांतरित न करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन न करणे, असे आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने निलंबन
वरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता नितीन मराठे यांनी कर्तव्यात अक्षम्य कसूर केल्याचे नमूद करत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी त्यांना आदेशाच्या दिनांकापासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे.
निलंबनाच्या कालावधीत त्यांना पंचायत समिती बोदवड अंतर्गत ग्रामपंचायतीत मुख्यालय देण्यात आले आहे. तसेच नियमानुसार त्यांना निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहणार असून, निलंबन काळात खासगी नोकरी, व्यवसाय, धंदा किंवा व्यापार स्वीकारलेला नाही, याबाबतचे प्रमाणपत्र दरमहा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दोषारोपपत्र सादर करण्याचे निर्देश
निलंबन आदेशाची नोंद संबंधित कर्मचाऱ्याच्या मूळ सेवापुस्तकात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध आवश्यक कागदपत्रांसह दोषारोपपत्र 1 ते 4 विनाविलंब सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत असून, आता पुढील चौकशीत संबंधित आरोपांबाबत नेमके काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.
रवि ज्वेलर्स,
सराफ बाजार, अमळनेर,
Mob. 70 74 74 21 21.
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 147000
22 Ct सोने 91.60% : ₹. 135300
18 Ct सोने 75.00% : ₹. 113200
शुद्ध चांदी 999%:₹. 2340/-
भाव प्रती 10 ग्राम
