अमळनेरच्या फरशी रोडवर पुन्हा जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी रस्त्यावर! एकीकडे नागरिक पाण्यासाठी वणवण, तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याची उधळपट्टी; तात्पुरत्या जोडणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहरात एकीकडे पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून नागरिकांना पाण्यासाठी दिवसन्-दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करावा लागत असताना, दुसरीकडे फरशी रोड परिसरात तात्पुरती जोडलेली जलवाहिनी पुन्हा एकदा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर आणि जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फरशी रोडवरील जलवाहिनीला गळती लागल्याने मोठ्या दाबाने पाणी बाहेर पडत असून काही काळातच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. लाखो लिटर पिण्याचे पाणी अक्षरशः नाल्यात अथवा रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ही जलवाहिनी यापूर्वीही गळतीमुळे चर्चेत आली होती. त्यामुळे वारंवार त्याच ठिकाणी निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा; रस्त्यावर मात्र पाण्याची उधळपट्टी!

अमळनेर शहरातील अनेक नागरिक सध्या पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे त्रस्त आहेत. घरगुती वापरासाठी आवश्यक पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना हंडे, कॅन घेऊन पाण्याच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे हजारो-लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जाण्याचे दृश्य नागरिकांच्या संतापात भर घालत आहे.
‘एकीकडे पाण्यासाठी नागरिकांची धावपळ आणि दुसरीकडे पाण्याची अशी उधळपट्टी का?’ असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
तात्पुरत्या जोडणीचा फटका नागरिकांना
फरशी रोडवरील जलवाहिनीची तात्पुरती जोडणी करण्यात आली असल्याचे सांगितले जात असताना, पुन्हा त्याच जलवाहिनीला गळती लागल्याने तात्पुरत्या उपाययोजनांचा दर्जा आणि त्यामागील नियोजनावर प्रश्न निर्माण झाले आहेत. वारंवार दुरुस्ती करूनही समस्या कायम राहत असेल तर केवळ वरवरची डागडुजी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
प्रशासन जागे होणार तरी कधी?
शहरात पाण्याचा तुटवडा जाणवत असताना उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि प्रत्येक थेंबाची बचत होणे अपेक्षित आहे. मात्र जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असतानाही अशी परिस्थिती निर्माण होणे म्हणजे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे.
पाण्याच्या एका थेंबासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असताना, दुसरीकडे रस्त्यावर पाण्याचे अक्षरशः लोट वाहत असतील तर याला जबाबदार कोण? जलवाहिनीची वारंवार गळती का होते? तात्पुरती जोडणी किती दिवस चालणार? आणि या पाणीगळतीवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने नागरिकांना देणे गरजेचे आहे.
फरशी रोडवरील जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून पाणीगळती थांबवावी तसेच भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असताना, अशा प्रकारे पाण्याची होणारी नासाडी म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे.
