मंगरूळ-शिरुड रस्ता मृत्यूचा सापळा; अर्धवट दुरुस्तीमुळे संतापशिरुड–मंगरूळ मार्गाची दुरवस्था; -माजी सरपंचांनी स्वखर्चाने बुजवले जीवघेणे खड्डे
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : शिरुड ते मंगरूळ या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा प्रवास जीवघेणा बनला आहे. चार किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी केवळ दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असून उर्वरित दोन किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिरुड, मंगरूळ, कावपिंप्रीसह परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा मार्ग दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार तसेच व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात. मात्र, नुकत्याच झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे रस्त्याची आणखी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावरील खड्डे न दिसल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. अखेर शिरुडचे माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने धोकादायक खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून ते बुजवण्याचे तसेच रस्त्याच्या साईटपट्ट्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत कौतुक केले आहे.
ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून उर्वरित मार्गाचे दर्जेदार व कायमस्वरूपी काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठा अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
