बिबट्याच्या वावरामुळे घाबरू नका, मात्र सतर्क राहा आमदार अनिल पाटील यांचे अमळनेर तालुक्यातील नागरिकांना आवाहन; वन विभाग सतर्क, दोन ठिकाणी पिंजरे.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : अमळनेर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून विविध भागांत बिबट्या आढळल्याच्या घटना समोर येत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदगाव शिवारात बिबट्याने हल्ला केल्याची घटना, तसेच परिसरातील शेतशिवारात आढळलेल्या पाऊलखुणांमुळे चिंता वाढली आहे. अंतुर्ली परिसरात डोळे चमकणारा प्राणी दिसल्याची चर्चाही सुरू आहे. याशिवाय ढेकू रस्त्यावर बकऱ्या चारणाऱ्यांना बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे.

पिळोदा, धुपी आणि देवळी शिवारातही बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा असून, पपईच्या शेतात बिबट्या लपल्याचे आणि त्यानंतर मक्याच्या शेतात दिसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी तसेच शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सर्व घटनांची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी दाखल होऊन पाहणी केली.
या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी वन अधिकारी छत्रपती चव्हाण यांच्याशी संपर्क साधून तालुक्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच वन विभागाने अधिक दक्षता घेऊन गस्त वाढवावी, अशा सूचना केल्या आहेत.
नागरिकांनी घाबरू नये, मात्र काळजी घ्यावी.
आमदार अनिल पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “अमळनेर तालुक्यात बिबट्या आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागरिकांनी ही बाब केवळ अफवा समजून बेसावध राहू नये; मात्र विनाकारण घाबरूनही जाऊ नये. विशेषतः शेतकरी बांधवांनी रात्री-अपरात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे. शेतात जाताना दोन-तीन जणांनी एकत्र जावे. सोबत बॅटरी आणि काठी ठेवावी. लहान मुलांना एकटे शेतात किंवा घराबाहेर सोडू नये. नागरिकांनी स्वतःची तसेच जनावरांची काळजी घ्यावी.”
वन विभागाकडून दोन ठिकाणी पिंजरे
बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर वन विभागाला सतर्क करण्यात आले असून तालुक्यात दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. या पिंजऱ्यांमध्ये सावज म्हणून बकरी ठेवण्यात आली आहे. मात्र रात्रीच्या वेळी शेतरस्त्यांवरून होणारी वाहनांची वर्दळ आणि आवाज यामुळे बिबट्या पिंजऱ्याजवळ येत नसावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
“मी स्वतः वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. वन विभागाचे पथक गस्त घालत आहे. बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यास त्याला लवकरात लवकर जेरबंद करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत. काही संशयास्पद दिसल्यास तात्काळ वन विभाग अथवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले.

