अमळनेर शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव; तातडीने फवारणी व फॉगिंगची ‘आप’ची मागणी.

0

अमळनेर | आबिद शेख 


अमळनेर शहरातील सर्व प्रभागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष महेंद्र जान सकुखे यांनी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन शहरभर तातडीने डास प्रतिबंधक औषध फवारणी व धूर फवारणी (फॉगिंग) करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी साचत असून अस्वच्छतेमुळे डासांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये डासांचा त्रास वाढल्याने लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून काही भागांत आजारी रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


नगरपरिषदेकडून नियमितपणे डास प्रतिबंधक फवारणी व फॉगिंग होत नसल्याचा आरोप करत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या :
शहरातील सर्व प्रभाग, रस्ते व गल्लीबोळांमध्ये तात्काळ जंतुनाशक औषध फवारणी करण्यात यावी.
सायंकाळच्या वेळेत नियमित फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात यावी.
साचलेली गटारे साफ करून त्यामध्ये ब्लिचिंग पावडर व जंतुनाशक टाकून स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी.
या मागण्यांकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष महेंद्र जान सकुखे यांची स्वाक्षरी असून नगरपरिषद प्रशासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed