लोकनियुक्त नगराध्यक्ष भेटत नसल्याने खुर्चीलाच निवेदन; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन अमरधामच्या आधुनिकीकरणासह प्रभाग क्र. ३ मधील गटारीच्या मागणीसाठी नगरपरिषदेत निदर्शने.
अमळनेर | आबिद शेख

लोकनियुक्त नगराध्यक्ष वारंवार भेटत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी अमळनेर नगरपरिषद कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्षांची भेट न झाल्याने त्यांच्या कार्यालयातील खुर्चीलाच निवेदन चिटकवून आंदोलनकर्त्यांनी शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदविला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश (डी.पी.) पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवक, महिला आणि प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगराध्यक्षांशी वारंवार संपर्क साधूनही भेट मिळत नसल्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असून, नागरिकांना भेटण्यासाठी वेळ न देणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी नगरपरिषद प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यामध्ये अमरधाम (स्मशानभूमी) येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. अमरधाममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षित वाहनतळ, सुसज्ज शोकसभागृह, एलईडी दिवे, पंखे, सार्वजनिक स्वच्छतागृह, लॉकर सुविधा, काँक्रीट पार्किंग, बोअरवेल व कायमस्वरूपी पाणीपुरवठा, वृक्षारोपण, नियमित स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, हिरवळ, आकर्षक लँडस्केपिंग तसेच धार्मिक भजने व शांती मंत्रासाठी साउंड सिस्टीम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
प्रभाग क्र. ३ मधील गटारीच्या कामाचीही मागणी
निवेदनात प्रभाग क्रमांक ३ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासोबत आवश्यक गटाराचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. पावसाचे व सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी अशोक बाबुलाल सोनवणे यांच्या घरापासून बापू सोमा भोई यांच्या घरापर्यंत तसेच दीपक रमेश भिल यांच्या घरापासून कलाबाई माधुकर पाटील यांच्या घरापर्यंत गटार बांधण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दुर्गेश (डी.पी.) पाटील यांनी सांगितले की, हे आंदोलन कोणाचाही अवमान करण्यासाठी नसून नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने करण्यात आले आहे. अमरधामच्या आधुनिकीकरणासह प्रभाग क्रमांक ३ मधील गटारीच्या कामाबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रविण (गुड्डू) संताजीराव देशमुख, भुषण लोहार, चेतन पवार, चेतन पाटील, कुणाल पाटील, सागर पाटील, ललित पाटील, कुशल पाटील, विवेक निकुम, अविनाश कुंभार, चिन्मय पाटील, मोहित शिंदे, सतीश पाटील, शरद पाटील, हर्षल शिंपी, मनिषा पाटील, कोमल पाटील, शोभाबाई मिस्तरी, ठगूबाई मराठे, राजश्री धनगर, भिकूबाई कोळी, ज्योती कुंभार, पार्वती मिस्तरी, ममताज रफिक, ऊषाबाई इदोरे, मंगळाबाई पाटील, कलाबाई पाटील, मीनाशी पाटील, बापू भोई, सागर लांडगे, जिग्नेश पाटील, विशाल धनगर, हर्षल पाटील, जयेश पाटील, मनिष पाटील, पंकज पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
