जळगावात खळबळ! आठ तरुणांच्या आंतरराष्ट्रीय गँगशी कथित संपर्काचा तपास तीव्र. -एटीएसची चौकशी आर्थिक व्यवहारांपर्यंत; भट्टी व बिष्णोई गँगशी कथित दूरध्वनी संपर्काचा तपास सुरू.
जळगाव /प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील आठ तरुणांचा पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी आणि राजस्थानातील लॉरेन्स बिष्णोई गँगशी कथित संपर्क असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र करण्यात आला आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणात दूरध्वनी संपर्क, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी सुरू केली आहे.

राज्यभरात एकाचवेळी राबविण्यात आलेल्या विशेष कारवाईदरम्यान सुमारे १७५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि भुसावळ तालुक्यातील आठ तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. नाशिक व जळगाव एटीएस तसेच जिल्हा अँटी टेररिस्ट ब्रँचच्या संयुक्त पथकाने भुसावळ येथे सलग दोन दिवस त्यांची कसून चौकशी केली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना पालकांच्या ताब्यात सोडण्यात आले असले, तरी तपास यंत्रणांचे लक्ष अद्याप त्यांच्यावर केंद्रित आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आठ संशयितांपैकी सात जणांचा शहजाद भट्टी गँगशी, तर एका तरुणाचा लॉरेन्स बिष्णोई गँगशी कथित संपर्क असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या दोन्ही गँगशी संबंधित व्यक्तींशी दूरध्वनीवरून संवाद झाल्याचे काही तांत्रिक पुरावे तपास यंत्रणांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या संपर्कामागील उद्देश आणि त्याचे स्वरूप काय होते, याचा तपास अद्याप सुरू आहे.
यासोबतच संबंधित तरुणांच्या बँक खात्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. अलीकडील काही महिन्यांत त्यांच्या खात्यांमध्ये मोठ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत का, निधी कोणाकडून आला, त्याचा कोणत्याही गुन्हेगारी किंवा संघटित नेटवर्कशी संबंध आहे का, याचा तपशीलवार मागोवा घेतला जात आहे. मोबाईल कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी, डिजिटल उपकरणांमधील माहिती आणि आर्थिक देवाणघेवाणीचे सर्व पैलू तपासले जात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण कारवाईपूर्वी संबंधित संशयितांवर तब्बल तीन महिन्यांपासून गुप्तपणे नजर ठेवण्यात आली होती. आयबी, एटीएस आणि एसआयटीच्या संयुक्त समन्वयातून त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यात आले आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
तपास यंत्रणांना काही तरुणांचे टप्प्याटप्प्याने ब्रेनवॉश करून त्यांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. आर्थिक प्रलोभन देत त्यांचा वापर विघातक कारवायांसाठी करण्याचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता तपासली जात आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणत्याही संशयिताविरुद्ध न्यायालयात दोष सिद्ध झालेला नसून तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून, तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
