‘नमस्ते दिवस’ निमित्त अमळनेर नगरपरिषदेकडून सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान; PPE किटचे वाटप, आरोग्य जनजागृती.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : केंद्र शासनाच्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) अभियानांतर्गत ‘नमस्ते दिवस’ निमित्त अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने इंदिरा गांधी भवन येथे सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या कार्याचा सन्मान करणे तसेच सुरक्षित आणि सन्मानजनक कामकाजासाठी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील, स्वच्छता निरीक्षक संतोष जाधव, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे तसेच शहर समन्वयक गणेश गढरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक, वाहक तसेच घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे शहर स्वच्छ ठेवण्यात असलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याणासाठी नगरपरिषद सातत्याने विविध उपक्रम राबवत राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमात उपस्थित कर्मचाऱ्यांना नमस्ते योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करून सुरक्षित पद्धतीने काम करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यानंतर महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांना नमस्ते योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या वैयक्तिक सुरक्षा साहित्याचे (PPE Kit) मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरपरिषदेने त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला दिलेले प्राधान्य कौतुकास्पद असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त करत नगरपरिषदेचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
यावेळी शहरातील विविध भागांमध्ये कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या नागरिकांनीही स्वच्छता विभागाशी संपर्क साधून नमस्ते योजनेअंतर्गत नाव नोंदणी करून शासनाच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील योगेश पवार, श्यामराव करंदीकर, महेंद्र बिऱ्हाडे, अनंत संदानशिव, युनूस शेख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
