दहा गड-किल्ल्यांची यशस्वी चढाई; चिमुकल्या तन्मयचा नवलेवाडी शाळेत गौरव.

0

अकोले : वय लहान, पण जिद्द मोठी! अवघ्या बालवयात महाराष्ट्रातील दहा ऐतिहासिक गड-किल्ले सर करण्याची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तन्मय केशव भांगरे याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवलेवाडी येथे विशेष सत्कार करण्यात आला. त्याच्या या धाडसी कामगिरीचे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

तन्मयने नुकताच ठाणे जिल्ह्यातील २ हजार ८१५ फूट उंचीचा माहुली किल्ला यशस्वीरीत्या सर केला. वडील दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे यांच्या सोबतीने त्याने ही मोहीम पूर्ण केली. बाप-लेकाच्या या यशस्वी मोहिमेमुळे तन्मयच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

तन्मयने आतापर्यंत भैरवगड (कोथळे), विश्रामगड-पट्टा किल्ला, अहमदनगरचा भुईकोट किल्ला, पेमगिरी किल्ला, बितनगड, शिवनेरी किल्ला, रत्नादेवी गर्दनी (टेहळणीचा किल्ला), बांद्रा फोर्ट (मुंबई), दुर्गाडी किल्ला (कल्याण) आणि माहुली किल्ला असे एकूण दहा गड-किल्ले सर केले आहेत.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड व शिक्षकवृंद यांच्या हस्ते तन्मयचा सत्कार करण्यात आला. यावेळी वर्गशिक्षिका स्वप्नाली महाजन, सोमनाथ वाजे, सुलताना शेख, राजेंद्र शिंदे, रंजना काकड आणि विद्या डहाळे उपस्थित होते.

तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमरजी माने, गटशिक्षणाधिकारी दीपक धुमाळ आणि अकोले बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी जनार्दन भवरे यांनीही तन्मयच्या धाडसाचे आणि जिद्दीचे विशेष कौतुक केले. शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी तन्मयचे वडील दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे यांनी सांगितले की, नोकरी आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळत सुट्टीच्या दिवशी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची भटकंती करण्याचे स्वप्न त्यांनी जोपासले आहे. या भटकंतीतून तन्मयला छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास प्रत्यक्ष गड-किल्ल्यांवर जाऊन समजावा, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत तन्मयने सोपे तसेच अवघड असे दहा किल्ले यशस्वीरीत्या सर केले आहेत. हा सत्कार केवळ तन्मयचा नसून शिवरायांच्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा आणि त्याच्या जिद्दीचा गौरव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तन्मयच्या या धाडसी कामगिरीमुळे त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्याच्या यशामुळे नवलेवाडी शाळेच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. भविष्यात आणखी गड-किल्ले सर करण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

जय शिवराय! 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed