राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी; डॉ. बी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती अभियान.

0

अमळनेर | आबिद शेख 


राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणामुळे अमळनेर तालुक्यात विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती अभियान सुरू करण्यात आले असून, मंदिरातील चोरीमागील सत्य जनतेसमोर यावे, अशी भूमिका या अभियानातून मांडण्यात आली आहे.


महाविकास आघाडी, अमळनेर यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जनजागृती फलकांद्वारे तपासावर कोणताही दबाव न येता तो निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने व्हावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मंदिरासारख्या श्रद्धास्थानातील चोरी ही गंभीर बाब असून, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच श्रद्धा, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत तपासावर विश्वास ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, उपलब्ध पुरावे, तांत्रिक माहिती आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू असून, अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed