पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केटीवेअर बंधारे व सिमेंट काँक्रीट रस्त्यांची मागणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना.
अमळनेर | आबिद शेख

रविवार, दि. १२ जुलै रोजी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन पांझरा नदीवरील मांडळ, मुडी आणि शहापूर परिसरात केटीवेअर (KT Weir) बंधारे उभारण्याबाबत तसेच अमळनेर–ढेकू–शिरसाळे–तरवाडे–वावडे–मांडळ ते मुडी या मार्गावरील रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून सिमेंट काँक्रीट (ट्रिमिक्स) रस्ते करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनात पांझरा नदीवर केटीवेअर बंधारे उभारल्यास परिसरातील भूजलपातळी वाढण्यास मदत होईल, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल तसेच शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल, असे नमूद करण्यात आले. तसेच अमळनेर ते मुडी या मार्गावरील रस्त्यांची अवस्था लक्षात घेता नागरिकांना प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने संबंधित रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट ट्रिमिक्स पद्धतीने काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मा. सभापती पंचायत समिती, अमळनेर डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील तसेच धुळे जिल्ह्याचे शिवसेना नेते श्री अण्णासो हिलाल माळी उपस्थित होते.
निवेदनाची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत प्रस्तावित कामे मार्गी लावण्यासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे या भागातील पाणी साठवण आणि रस्ते विकासाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
