पोलीसांच्या ‘मुद्देमाल सुपूर्त’ मोहिमेला यश; अमळनेर उपविभागातून ३४.०८ लाखांचा ऐवज मूळ मालकांच्या स्वाधीन.
अमळनेर/आबिद शेख

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर राबविण्यात आलेल्या ‘मुद्देमाल सुपूर्त’ मोहिमेअंतर्गत शनिवारी (दि. ११) जळगाव येथील पद्मालय हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अमळनेर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बalnerल ३४ लाख ८ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अमळनेर पोलीस ठाण्यातील १३ विविध गुन्ह्यांमधील सुमारे २० लाख ६७ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला. यात ७० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच २६ मोबाईल फोनचा समावेश होता.
पारोळा पोलीस ठाण्याने एका मंदिरातील चोरीच्या गुन्ह्यातील मारुतीच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट, चांदीच्या मासळ्या तसेच १४ मोबाईल फोन असा ४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल संबंधित मालकांना परत दिला.
एरंडोल पोलीस ठाण्याने चोरीस गेलेले तीन ट्रॅक्टर आणि तीन मोबाईल फोन असा ८ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल सुपूर्द केला. तर मारवड पोलीस ठाण्याने चोरीस गेलेली हिरो कंपनीची मोटारसायकल मूळ मालकाकडे परत दिली.
या मोहिमेमुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत असून, चोरीस गेलेला माल कायदेशीर प्रक्रियेनंतर लवकरात लवकर मालकांना परत मिळावा यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने विशेष प्रयत्न सुरू ठेवले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याच कार्यक्रमात जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि पोलीस पाटील यांचाही गौरव करण्यात आला. अमळनेर उपविभागातील मंगरुळ (ता. अमळनेर) येथील पोलीस पाटील भागवत बापू पाटील यांनी एका गुन्ह्याच्या तपासात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
