९ कोटींच्या कथित निधी गैरव्यवहारप्रकरणी माजी आमदार शिरीष चौधरींसह चौघांवर गुन्हा; बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी वळवल्याचा आरोप. -माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या नावाचा कथित गैरवापर; पोलिसांकडून आरोपींचा शोध, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू.

0

अमळनेर/आबिद शेख
अमळनेर : नंदुरबार शहरातील विविध समाजांच्या सभागृहांसाठी तसेच मंदिरांच्या विकासकामांसाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ९ कोटी रुपयांच्या शासकीय निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्यासह चौघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


नंदुरबार शहर भाजप कार्यालयाचे प्रमुख अशोक शिवाजी बेहेरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून गुन्हा क्रमांक ६६५/२०२६ नोंदविला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ६१, ३१८(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३६(४), ३३८ आणि ३४० अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, तत्कालीन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या कार्यकाळात २०२२ ते २०२४ या कालावधीत विविध विकासकामांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला होता. मात्र, डॉ. गावीत आजारी असताना त्यांच्या नावाचे कथित बनावट लेटरहेड आणि बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून मंत्रालयात शुद्धीपत्रके सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. या कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे मूळ शासन निर्णयात बदल करून जवळपास ९ कोटी रुपयांचा निधी अन्य कामांकडे वळविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, गौरव प्रकाश चौधरी, नयन दिलीप चौधरी, किशोर तुळशीराम पाटील (अकाउंटंट, रा. रनाळे) तसेच इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, प्राथमिक चौकशीत वळविण्यात आलेल्या निधीपैकी सुमारे २ कोटी रुपयांची विकासकामे कै. हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या नावाने स्मृती उद्यान आणि सभागृहासाठी मंजूर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या निधी वळविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी सुरू असून, संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याविरुद्ध यापूर्वी खूनाचा प्रयत्न, विनयभंग, दंगा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यांसारख्या विविध स्वरूपाचे एकूण १६ गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या काही सहकाऱ्यांविरुद्धही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भट्ट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कथित आर्थिक गैरव्यवहारातील नेमकी जबाबदारी निश्चित करण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed