मुलाला शौचालयात घेऊन जाते सांगून घराबाहेर पडलेली २६ वर्षीय महिला ५ वर्षीय मुलासह बेपत्ता.
अमळनेर | आबिद शेख

मुलाला सार्वजनिक शौचालयात घेऊन जाते असे सांगून घराबाहेर पडलेली २६ वर्षीय महिला आपल्या ५ वर्षीय मुलासह बेपत्ता झाल्याची घटना ६ जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी महिला व मुलाचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार ६ जुलै रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता ही महिला आपल्या ५ वर्षीय मुलाला सार्वजनिक शौचालयात घेऊन जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी गावात, अमळनेर शहरात तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही तिचा व मुलाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
अखेर महिलेच्या भावाने मारवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत असून, अमळनेर पोलीस आणि मारवड पोलीस महिला व मुलाचा शोध घेत आहेत.
