अमळनेर शहरात डी.पी. रोडसह मोकळ्या भूखंडांवर तातडीने वृक्षलागवड करा; राजमुद्रा फाऊंडेशनची नगरपरिषदेकडे मागणी.

0

अमळनेर | आबिद शेख 


अमळनेर शहरातील वाढते तापमान, झपाट्याने होणारे काँक्रीटीकरण आणि घटत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता डी.पी. (८० फुटी) रोडच्या दुभाजकांसह शहरातील विविध रस्त्यांच्या दुतर्फा, खुल्या भूखंडांवर आणि उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये तातडीने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात यावी, अशी मागणी राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्याम जयवंतराव पाटील यांनी अमळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २०२६ च्या उन्हाळ्यात अमळनेर शहराने इतर अनेक शहरांच्या तुलनेत अधिक उष्णतेचा सामना केला. गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि नागरीकरण वाढल्याने हरित क्षेत्रात घट झाली असून त्याचा थेट परिणाम शहराच्या तापमानावर होत आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार अमळनेर शहराची लोकसंख्या सुमारे ९५ हजार होती. मागील १५ वर्षांत त्यात आणखी वाढ झाली आहे. तर नगरपरिषदेने सन २०२२ मध्ये केलेल्या वृक्षगणनेनुसार शहरात केवळ ७३ हजार ५२३ वृक्ष असल्याची नोंद आहे. वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध वृक्षसंख्या यांचा विचार करता शहरात प्रतिव्यक्ती एकही वृक्ष उपलब्ध नसल्याचे चित्र असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या नगरपरिषदेमार्फत सुरू असलेल्या डी.पी. (८० फुटी) रस्त्याच्या कामामध्ये उभारण्यात आलेल्या दुभाजकांमध्ये तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा आणि विविध मोकळ्या भूखंडांवर याच पावसाळ्यात वृक्षलागवडीचा विशेष उपक्रम राबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात शहराचे तापमान कमी होण्यास, पर्यावरण संतुलित राहण्यास आणि नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद आहे.
यापूर्वीही या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. ९ जून २०२५ रोजी तत्कालीन मुख्याधिकारी तुषार नेरकर तसेच २३ एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना यासंदर्भात निवेदने देण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत व्यक्त करत नगराध्यक्षांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने वृक्षलागवडीची प्रभावी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी श्याम जयवंतराव पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed