साने गुरुजी कर्मभूमी स्मारक परिसराला संरक्षणासाठी कंपाऊंडची मागणी; दर्शना पवार यांचा लोकमत जागविण्याचा निर्धार.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या जागेवर सुमारे ११ हजार झाडांचे संवर्धन व संगोपन सुरू असून, या परिसराला संरक्षण देण्यासाठी तातडीने कंपाऊंड उभारण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी दर्शना पवार यांनी केली आहे.


त्यांच्या म्हणण्यानुसार, परिसराला कंपाऊंड नसल्यामुळे समाजकंटकांकडून दोन वेळा आग लावण्यात आली, त्यामुळे अनेक झाडांचे नुकसान झाले. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात कंपाऊंडच्या कामापैकी सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले, मात्र त्यानंतर उर्वरित काम रखडल्याचे त्यांनी सांगितले.
दर्शना पवार यांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कंपाऊंडच्या उर्वरित कामासाठी अपेक्षित मदत मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना आवाहन करत, “झाडांच्या संरक्षणासाठी कंपाऊंड आवश्यक आहे का?” या विषयावर जनमत तयार करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी आमदारांना फोन करून किंवा पत्राद्वारे या कामासाठी पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
जनमत मोहिमेची सुरुवात संत सखाराम महाराज वाडी संस्थानचे ११ वे गादीपती ह.भ.प. पूज्य प्रसाद महाराज यांचे मत जाणून घेऊन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत समाजहिताचा निर्णय घेतला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, “माझे कोणाशीही वैयक्तिक शत्रुत्व नाही. माझ्या गरजा मर्यादित असून मी कधीही वैयक्तिक फायद्यासाठी कोणाकडे मदत मागितलेली नाही. हा विषय केवळ पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा आहे,” असे दर्शना पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed