‘एक पेड माँ के नाम’ अभियानाला अमळनेरात उत्स्फूर्त प्रतिसाद; रोटरी क्लबतर्फे वृक्षारोपण करून वन महोत्सव साजरा.

0

अमळनेर | आबिद शेख 


वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब अमळनेरतर्फे “एक पेड माँ के नाम” या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण अभियान-२०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पर्यावरण संरक्षण, हरित अमळनेर आणि वृक्षसंवर्धनाचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब अमळनेर, अमळनेर नगर परिषद, महिला हाऊसिंग ट्रस्ट, पर्यावरण सखी आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रो. अजय केले यांच्या निवासस्थानासमोरील मोकळ्या जागेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल सुनीता धनगर, वनरक्षक अलका पाटील आणि वनरक्षक जगदीश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत परिसर अधिक हिरवागार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी रो. अजय केले यांच्या पत्नी सौ. विनिता अजय केले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्याऐवजी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. पर्यावरणपूरक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या या अभिनव संकल्पनेचे उपस्थितांनी विशेष स्वागत करत कौतुक केले.

कार्यक्रमात डॉक्टर शिबी वशिष्ठ यांनी त्यांच्या “भाग्यश्री” या उपक्रमांतर्गत शेळ्यांच्या लेंड्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत वृक्षांच्या संगोपनासाठी भेट दिले. हे नैसर्गिक खत झाडांच्या चांगल्या वाढीस, मुळांच्या बळकटीस आणि पर्यावरणपूरक संवर्धनासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. महेश पाटील आणि सचिव रो. प्रशांत निकम यांनी वन महोत्सवाच्या माध्यमातून “एक पेड माँ के नाम” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. प्रकल्प प्रमुख रो. अजय केले आणि रो. आशिष चौधरी यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे नियमित संगोपन करण्याचे आवाहन केले.

या वृक्षारोपण अभियानात रोटरी क्लबचे सदस्य विवेक देशमुख, अजय रोडगे, कीर्तिकुमार कोठारी, दिनेश रेझा, प्रतीक जैन यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

“एक झाड लावूया… पर्यावरण वाचवूया” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed