छमछम’वर राज्य सरकारचा दणका; ऑर्केस्ट्रासाठी नवे नियम लागू.

0

24 प्राईम न्यूज 8 Juli 2026.

                          राज्यात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील नृत्यप्रकारांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासंदर्भातील सुधारणा विधेयक मंगळवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.
या सुधारणेनंतर हॉटेल, उपहारगृहे आणि बार यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत मिळालेल्या ऑर्केस्ट्रा परवान्याच्या आधारे नृत्याचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. अशा आस्थापनांना आता महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे, मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम, २०१६ अंतर्गत आवश्यक परवानग्या घेऊन त्यातील सर्व नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे.


सध्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३३ अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांकडून ऑर्केस्ट्रा व लाईव्ह म्युझिक कार्यक्रमांसाठी परवाने दिले जातात. मात्र अनेक ठिकाणी या परवान्याचा गैरवापर करून अश्लील नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे डान्स बारवरील कायदेशीर निर्बंधांना बगल दिली जात असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली होती.
या पार्श्वभूमीवर ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांनाही डान्स बारप्रमाणे कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी राज्य सरकारने सुधारणा विधेयक सादर केले. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले असून ते सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले. या निर्णयामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली होणाऱ्या अश्लील नृत्यप्रकारांवर अधिक प्रभावी नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed