सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा! अमळनेरच्या खदाणीत तीन अल्पवयीन मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू.

0

अमळनेर | आबिद शेख 


अमळनेर शहराला हादरवून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. चोपडा रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळील खदाणीत सेल्फी काढण्याचा मोह तीन अल्पवयीन मित्रांच्या जीवावर बेतला. बेटासारख्या उंचवट्यावर उभे राहून सेल्फी काढत असताना एका मुलाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या दोन्ही मित्रांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर तिन्ही मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.


या दुर्घटनेत मानव बंटी रतनानी (वय १४), कार्तिक विकी उधवानी (वय १४) आणि दिनेश विजय पंजवानी (वय १७) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिघेही अमळनेर शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी होते.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहरावर शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खदाणी, तलाव, नदी तसेच इतर खोल पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच सेल्फी काढण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed